फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेसाठी परीक्षा केंद्र/उपकेंद्र/परिरक्षक यांच्या माहितीसह नोंदणी करणे, परीक्षेस प्रविष्ट झालेल्या परीक्षार्थ्यांची उपस्थिती, गैरमार्ग प्रकरणांची माहिती, सहायक परिरक्षक (रनर)/बैठे पथक, भरारी पथक व तत्सम अहवाल ऑनलाईन घेण्यासाठी तांत्रिक सूचना
नोंदणीसाठी (For Registration)

अ) केंद्रसंचालकांसाठी :

१. फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा दैनंदिन अहवाल (Daily Report) ऑनलाईन भरण्यासाठी सर्व केंद्रसंचालकांनी मंडळाने निर्धारीत केलेल्या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असेल. सदर नोंदणी केवळ एकदाच करावयाची आहे.
२. ऑनलाईन नोंदणीसाठी इ. १२ वी करीता मंडळाच्या http://attendance.mh-hsc.ac.in या व इ. १० वी करीता मंडळाच्या http://attendance.mh-ssc.ac.in अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.
३. उपरोक्त संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्व माहिती अचूक व परिपूर्ण भरावी.
४. माहिती भरताना काही समस्या आल्यास संकेतस्थळावरील HELP या टॅबमध्ये जाऊन माहिती कशी भरावी या संदर्भातील व्हीडीओ पहावा. तद् नंतरही समस्या असल्यास दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
५. केंद्रसंचालकांनी नोंदणी (Registration) करताना खालीलप्रमाणे माहिती भरावी
अ. मुख्य केंद्राची माहिती भरताना ड्रॉप डाउन (Drop Down)लिस्टमधून विभागीय मंडळ, परीक्षा (HSC/SSC), जिल्हा, तालुका निवडावा. त्यानंतर मुख्य परीक्षा केंद्राचा क्रमांक व नांव निश्चित करावे. तद् नंतर मुख्य परीक्षा केंद्र असलेल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचा सात अंकी मंडळ सांकेतांक (Index Number) अचूक भरावा.
ब. केंद्रसंचालकांची वैयक्तिक माहिती भरताना आडनाव, नाव, मधले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व केंद्रसंचालकांची जन्मतारीख इ. माहिती अचूक भरावी.
क. परीक्षा केंद्र ज्या परिरक्षण केंद्राला (Custody) जोडले आहे त्याबाबतची माहिती केंद्रसंचालकांनी अचूक भरणे आवश्यक आहे. त्यामध्ये परिरक्षकांचे आडनाव, नाव, मधले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व परिरक्षण केंद्राचा क्रमांक नमूद करावा.
ड. मुख्य परीक्षा केंद्र / उपकेंद्रातील परीक्षार्थ्यांची कमाल संख्या व भौतिक सुविधांबाबत केंद्र / उपकेंद्रनिहाय माहितीचा तक्ता परिपूर्ण भरावा.
  • सुरवातीला Select Main Centre या रकान्यामध्ये मुख्य केंद्र असलेल्या एकाच ठिकाणी Tick Mark (✓) करावे.
  • केंद्र / उपकेंद्रनिहाय कमाल परीक्षार्थी संख्या नोंदविताना सदर उपकेंद्रावर विषयनिहाय प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांची संख्या विचारात घेवून त्यातील कमाल संख्या नोंदवावी. पुरेशा वर्गखोल्या असल्याची निश्चिती करण्यासाठी २५ परीक्षार्थ्यासाठी एक वर्गखोली याप्रमाणे गणना करावी.
  • प्रत्येक वर्गखोलीसाठी एक पर्यवेक्षक, मंडळाच्या तरतूदीनुसार आवश्यक राखीव पर्यवेक्षक, आवश्यक चतुर्थश्रेणी कर्मचारी, लिपीक, केंद्रसंचालक/उपकेंद्रसंचालक/बिल्डींग कंडक्टर इ. विचारात घेवून पुरेसे मनुष्यबळ असल्याची निश्चिती करावी.
  • पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी विद्युत सुविधा असल्याचे निश्चितीकरण करावे.
  • पाणी व्यवस्था पुरेशी असल्याची निश्चिती करावी.
  • उपरोक्त प्रमाणे मुद्दा ड मधील सर्व माहिती, भौतिक सुविधा उपलब्ध असल्याबाबत त्या त्या रकान्यात केंद्र / उपकेंद्रनिहाय आहेत/नाहीत याबाबतची वस्तुनिष्ठ माहिती भरावी/निश्चित करावी. प्रत्येक उपकेंद्राच्या शेवटी भरलेल्या माहिती Confirm करण्यासाठी दिलेल्या रकान्यात Tick Mark (✓) करावे.
ई.मुख्य परीक्षा केंद्र व त्यास संलग्न असल्यास त्या उपकेंद्रांची माहिती परिपूर्ण भरल्यानंतर शेवटी दिलेल्या सबमिट (Submit) या बटणावर क्लिक करावे. सदर माहिती सबमिट करताना “भरलेली माहिती तपासून खात्री करा, एकदा भरलेली माहिती बदलता येणार नाही" असा संदेश दिसेल. त्याच प्रमाणे Confirm व Back हे दोन बटन दिसतील. माहिती अचूक असल्यास Confirm हे बटण क्लिक करून माहिती सबमिट करावी. अथवा भरलेल्या माहितीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास Back या बटणाचा वापर करून माहितीमध्ये आवश्यक दुरूस्ती करावी व अंतिम माहिती उपरोक्त पध्दतीने सबमिट करावी.
फ.अंतिमतः माहिती सबमिट केल्यानंतर अपवादात्मक परिस्थितीमध्ये माहितीत काही बदल असल्यास प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
ग. माहिती सबमिट (Submit) केल्यानंतर केंद्रसंचालकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर केंद्रसंचालकांना दैनंदिन अहवाल परीक्षेच्या दिवशी निर्धारीत वेळेत भरता येईल. याकरिता परीक्षा केंद्राचा क्रमांक व केंद्रसंचालकांचा भ्रमणध्वनी क्रमांक व केंद्रसंचालकांची जन्मतारीख वापरून लॉगईन करता येईल. केंद्रसंचालकांनी आपल्या केंद्राबरोबरच अधिनस्थ उपकेंद्र असल्यास त्या उपकेंद्राचा दैनंदिन अहवाल त्याच दिवशी दिलेल्या कालमर्यादेत ऑनलाईन भरणे अनिवार्य असेल.

ब) परिरक्षकांसाठी :

१. फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा दैनंदिन अहवाल (Daily Report) ऑनलाईन भरण्यासाठी सर्व परिरक्षकांनी मंडळाने निर्धारीत केलेल्या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असेल. सदर नोंदणी केवळ एकदाच करावयाची आहे.
२. ऑनलाईन नोंदणीसाठी इ. १२ वी करीता मंडळाच्या http://attendance.mh-hsc.ac.in या व इ. १० वी करीता मंडळाच्या http://attendance.mh-ssc.ac.in अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा.
३.उपरोक्त संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्व माहिती अचूक व परिपूर्ण भरावी.
४. माहिती भरताना काही समस्या आल्यास संकेतस्थळावरील HELP या टॅबमध्ये जाऊन माहिती कशी भरावी या संदर्भातील व्हीडीओ पहावा. तद् नंतरही समस्या असल्यास दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
५.परिरक्षकांनी नोंदणी (Registration) करताना खालीलप्रमाणे माहिती भरावी
अ.परिरक्षण केंद्राची माहिती भरताना ड्रॉप डाउन (Drop Down) लिस्टमधून विभागीय मंडळ, परीक्षा (HSC/SSC), जिल्हा, तालुका निवडावा. त्यानंतर परिरक्षण केंद्राचा क्रमांक निश्चित करावा.
ब. परिरक्षकांची वैयक्तिक माहिती भरताना आडनाव, नाव, मधले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व परिरक्षकांची जन्मतारीख इ. माहिती अचूक भरावी.
क. उपरोक्त माहिती परिपूर्ण भरल्यानंतर शेवटी दिलेल्या सबमिट (Submit) या बटणावर क्लिक करावे. सदर माहिती सबमिट करताना “भरलेली माहिती तपासून खात्री करा, एकदा भरलेली माहिती बदलता येणार नाही" असा संदेश दिसेल. त्याचप्रमाणे confirm व Back हे दोन बटन दिसतील. माहिती अचूक असल्यास Confirm हे बटण क्लिक करून माहिती सबमिट करावी. अथवा भरलेल्या माहितीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास Back या बटणाचा वापर करून माहितीमध्ये आवश्यक दुरूस्ती करावी व अंतिम माहिती उपरोक्त पध्दतीने सबमिट करावी.
ड. अंतिमतः माहिती सबमिट केल्यानंतर अपवादात्मक परिस्थितीमध्ये माहितीत काही बदल असल्यास प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्यापूर्वी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
इ. माहिती सबमिट (Submit) केल्यानंतर परिरक्षकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर परिरक्षकांनी त्यांचे अधिनस्थ सर्व मुख्य परीक्षा केंद्रांचा दैनंदिन अहवाल परीक्षेच्या दिवशी निर्धारीत वेळेत भरला जाईल याची वेळोवेळी खात्री करावी लागेल. याकरिता परिरक्षण केंद्राचा क्रमांक व परिरक्षकांचा भ्रमणध्वनी क्रमांक व परिरक्षकांची जन्मतारीख वापरून लॉगईन करता येईल. परिरक्षकांनी आपल्या अधिनस्थ सर्व मुख्य केंद्रांचा दैनंदिन अहवाल त्याच दिवशी दिलेल्या कालमर्यादेत ऑनलाईन भरल्याची खात्री आपल्या लॉगइनद्वारे करावी. सर्व परीक्षा केंद्रांनी माहिती भरल्याची खात्री झााल्यानंतर Confirm बटण क्लिक करून त्याच दिवशी त्याची निश्चिती करावी.